मावळातील कर्जमुक्ती पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण नोंद पावत्यांचे वाटप
कान्हे, मावळ दि. 1 (प्रतिनिधी) : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन सरकारने या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलेलं आहे, यापुढेही शेतकरी हितालाच प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती मावळचे आ. सुनिल शेळके यांनी दिली.
कान्हे,साते,मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी विनोदेवाडी ,जांभुळ येथील १०३ शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्ज माफी जाहिर झाली आहे. त्या निमीत्त आधार प्रमाणीकरण नोंद पावती लाभार्थी शेतकरी मंदा रमेश गाडे, ताईबाई जालिंदर सोरटे, देवराम सखाराम गाडे यांना आमदार शेळके यांच्या हस्ते पी.डी.सी.सी. बँक, कान्हे फाटा येथे देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी चेअरमन उर्मिला जांभुळकर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब काकरे, सचिव गणपत भानुसघरे,
माजी चेअरमन सातकर, महादु सातकर, संजय शिंदे, लक्ष्मण आगळमे, रमेश गाडे, एकनाथ येवले, दत्ता निम्हण, पै.चंद्रकांत सातकर, नंदाताई सातकर, बंडोबा सातकर यांच्यासह या भागातील शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. शेळके म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेतील रक्कम जमा होणार आहे. कसल्याही प्रकारची शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये हा सरकारचा प्रयत्न नेहमीच राहणार आहे.